आदित्य बोराटे

इंदापूर : आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी इंदापूर पोलिस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य तसेच शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील आणि पत्रकारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांनी विविध शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १२) सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत ही बैठक झाली. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

गणेश मंडळांनी उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित विभागांकडून वेळेत घ्याव्यात. मंडप उभारताना वाहतुकीस तसेच आपत्कालीन वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्युत व्यवस्था अधिकृत व सुरक्षित पद्धतीने करून घ्यावी तसेच उघड्या विद्युत तारा ठेवू नयेत. मंडपात अग्निशमनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व अग्निशामक यंत्रे उपलब्ध ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
ध्वनिक्षेपकाचा वापर शासन व सक्षम प्राधिकरणाने निश्चित केलेल्या वेळेत आणि ध्वनिमर्यादेतच करावा. मोठ्या आवाजातील साउंड सिस्टीममुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. मंडळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यरत ठेवावेत. गर्दीचे योग्य नियोजन करून महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांना गर्दी नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीबाबत सूचना द्याव्यात.
संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. भांडण, वाद, अश्लील घोषणाबाजी, आक्षेपार्ह फलक तसेच धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे कार्यक्रम व घोषणा टाळाव्यात. सोशल मीडियावर अफवा अथवा जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गाचे व वेळेचे पालन करावे. वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना बसवू नये तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे. डीजे अथवा ध्वनिक्षेपकामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मद्यपान करून येणाऱ्या व्यक्तींना मंडळाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेऊन गैरप्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
हरवलेल्या मुलांसाठी किंवा व्यक्तींसाठी स्वतंत्र मदत कक्ष अथवा घोषणा व्यवस्था ठेवावी. पार्किंगची योग्य व्यवस्था करून रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या दिवशी ध्वनिक्षेपकाला परवानगी : गणेशोत्सवातील सहावा दिवस (१९ सप्टेंबर), सातवा दिवस (२० सप्टेंबर), नववा दिवस (२२ सप्टेंबर), दहावा दिवस (२३ सप्टेंबर) आणि बारावा दिवस (२५ सप्टेंबर) या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जनजागृतीचे आवाहन : गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करावी. मंडळांच्या परिसरात बालविवाह प्रतिबंध, नशामुक्ती, क्रीडा प्रोत्साहन तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यांसारखे जनजागृतीपर बॅनर लावावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.






