पुणे : पुण्यात पाषाण-बावधन मार्गावरील नेकलेस गार्डन भागात एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरेंद्र द्विवेदी असे या अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकाचे नाव आहे. रोजच्या सवयीप्रमाणे ते रस्त्याने मॉर्निंग वॉक करत असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अत्यंत वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने विरेंद्र द्विवेदी यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने त्याच कारमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कार एक 19 वर्षांचा तरुण चालवत होता. दरम्यान, या प्रकरणात वापरण्यात आलेल्या कारच्या मालकीविषयी काही प्रश्न निर्माण झाले आहेत. प्राथमिक तपासात ही कार ‘BLUERAYS Developers’ या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असून तिचा पत्ता ‘ABIL हाऊस’ असा असल्याचे समोर आले आहे. मात्र, अपघाताच्या वेळी गाडी नेमकी कोणाच्या ताब्यात होती आणि ती कोण चालवत होते, याविषयी पोलिसांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या घटनास्थळाची पाहणी करत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.







