मुंबई :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 15 वा दिवस उजाडला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक घेऊन एक मोठी घोषणा केली. येत्या 15 सप्टेंबर रोजी मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार असून, जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आपले उपोषण पुढे सुरू ठेवणार आहेत. जरांगे यांच्या या निर्णयावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे.

मुंबईत हे आंदोलन झाल्यास आणि विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजपासून वंचित राहावे लागल्यास जबाबदार कोण, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, आंदोलनासाठी गणेशोत्सवाचा काळ मुद्दाम निवडण्यात आल्याचा आरोप करत, सणासुदीच्या दिवसांत मुंबईत बाधा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सदावर्ते म्हणाले. या मुद्द्यावरून गणेशभक्तांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.आपल्या वक्तव्यात सदावर्ते यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. राजकीय स्वार्थासाठी पडद्यामागून छुपे राजकारण बंद करण्याचे आवाहन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले.

कायदा आणि नियमांचा दाखला देत सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, संध्याकाळी 5 वाजेनंतर आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी नसते. त्यामुळे जरांगे पाटील यांनाही अशा प्रकारे नियम डावलून आंदोलन करता येणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे स्पष्ट करत या संपूर्ण आंदोलनाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या भूमिकेमुळे जरांगे यांच्या आंदोलनापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुबंईकडे मोर्चा नेण्याची मोठी घोषणा केली आहे.आंदोलनाचा प्रवास बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून सुरू होणारा हा प्रवास अहिल्यानगरचे श्रीगोंदा, पुण्याचे हडपसर आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरणे असा चार टप्प्यांत मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचेल.







