मुंबई : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र आंदोलनाआधी मोठी ठिणगी पडली आहे.गेल्या आंदोलनात अन्नाची, पाण्याची आणि रसद पुरवठ्याची मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या वेळी मुंबई आंदोलनात सहभागी न होण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे. या भूमिकेमुळे जरांगे यांच्या आंदोलनापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुबंईकडे मोर्चा नेण्याची मोठी घोषणा केली आहे.आंदोलनाचा प्रवास बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून सुरू होणारा हा प्रवास अहिल्यानगरचे श्रीगोंदा, पुण्याचे हडपसर आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरणे असा चार टप्प्यांत मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचेल. उपोषणाच्या 15 व्या दिवशी त्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून, समर्थकांना शांततेत व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, या प्रस्तावित आंदोलनाला सुरुवातीलाच अंतर्गत मतभेदांचा मोठा फटका बसला आहे. नाशिकच्या समन्वयकांनी आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यांची कारणे स्पष्ट केली आहेत.आरक्षणाच्या मागण्या कायदेशीर चौकटीत कशा बसणार आणि न्यायालयात कशा टिकणार, याबाबत जरांगे यांच्याकडे ठोस आराखडा नाही.आंदोलनासोबत असलेले कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती यांच्या मार्गदर्शनाकडे जरांगे दुर्लक्ष करत असून, यामुळे आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे.

गेल्या वेळी योग्य नियोजनाशिवाय मुंबई गाठली, नंतर जल्लोषही केला; मात्र शेवटी सरकारच्या पोकळ आश्वासनांमुळे मराठा समाजाची निराशाच झाली. स्वतःचा वेळ व पैसा खर्च करूनही, केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न मांडल्यामुळे जरांगे यांच्या समर्थकांकडून आणि डिजिटल विंगकडून वैयक्तिक पातळीवर टीका केली जात असल्याचे समन्वयकांनी दुःखाने नमूद केले.
वारंवार होणारी दिशाभूल आणि अस्पष्ट धोरणामुळे पुन्हा मुंबईला जाण्यात काही अर्थ उरलेला नाही, असे मत व्यक्त करत नाशिकच्या कार्यकर्त्यांनी या वेळी पाठ फिरवली आहे. प्रमुख सहकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







