पुणे : पाणी पिण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वडकी नाला येथील एका वेल्डींगच्या दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे
याबाबत भामाबाई शिवराम भोसले (वय-८५ रा. वडकी नाला, वडकी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून अक्षय सोमनाथ चौधरी (वय-२२ रा. पॅराडाइस सोसायटी, चिखली, पिंपरी चिंचवड), महादेव प्रकाश तिर्थे (वय-२ रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, पिंपरी चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातु विकास याचे वडकी नाला येथे कानिफनाथ फॅब्रीकेशन या नावाने वेल्डींगचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्य़ादी दुकानासमोर बसल्या होत्या. त्यावेळी दोघे दुचाकीवरुन दुकानाजवळ आले. आणि फिर्यादी वयस्कर असल्याचा फायदा घेऊन आरोपींनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले.
पाणी पिण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावली. आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. याबाबत फिर्य़ादी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.