लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर फाट्यावर थेऊर गावाकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ थांबलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकी चालकाने जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दीपक दगडू बेडेकर ( वय – 41, माळवाडी कोलवडी, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांच्या श्री स्वामी समर्थ ॲम्बुलन्स सर्विसने जखमीला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू उपचारापूर्वी झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा ट्रक हा थेऊर फाट्यावर थेऊर गावाकडे जाण्यासाठी रेल्वे पुलाजवळ थांबला होता. यावेळी दुचाकी चालक हा पुणे – सोलापूर महामार्गावरून थेऊरच्या बाजूकडे निघाला होता. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो थेट उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागील बाजूला धडकला.
दरम्यान, दुचाकी चालकाच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता. तसेच दुचाकी ही ट्रकच्या खाली जाऊन अडकली होती. यावेळी उरुळी कांचन वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी राजेश पवार, वार्डन सुशांत वरळीकर व नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.