उरुळी कांचन, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे (अन्वेषण) ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरातून ताब्यात घेतले आहे.
अक्षय अनिल अडसूळ (वय – 26 रा. कोंढापुरी ता. शिरूर) व सम्यक विनोद खंडारे (वय -20 रा. मलठण फाटा, शिक्रापूर ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिह्वामध्ये जबरी चोरीच्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तपास करीत असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा वरील दोघांनी केली असल्याची माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली होती.
त्यानुसार वरील दोघांना शिक्रापूर परिसरातून दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कामी आरोपींना यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजू मोमीन यांनी केली आहे.