उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर व शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात वाहनचालकांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय ज्ञानेश्वर कांबळे (वय २३, रा. गिरमेवस्ती, बालाजी नर्सरी, उरुळी कांचन, ता. हवेली, मुळ रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) व किसनराव बबनराव भोंडवे (वय ६३, रा. कासुर्डी भोंडवे वस्ती, ता. दौंड) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी ज्ञानेश्वर मल्हारी कांबळे (वय ४८) व संदीप किसनराव भोंडवे (वय ३३) यांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १९) ज्ञानेश्वर कांबळे यांचा मुलगा अजय कांबळे हा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नविन कालव्याच्या पुलावरून रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत किसनराव भोंडवे शनिवारी (ता. १६) हे पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास निघाले होते. या वेळी सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रेयस फ्लोरा नर्सरी येथे आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धक्का दिला. या अपघातात भोंडवे हे गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापती झाल्या होत्या. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या दोन्ही अपघातांतील जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश जगताप व पोलीस हवालदार जगताप हे करीत आहेत.