उरुळी कांचन, (पुणे) : भांडण मिटवल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांना चारचाकीने जोरात धडक दिल्याची घटना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. 30) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल शितोळे, आकाश राखपसरे, विशाल शितोळे, विशाल पवार, (रा. सर्व उरूळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. तर या घटनेत विपुल विठ्ठल महाडीक (वय ३०) व रुपेश महाडिक (रा. दोघेही काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी विपुल महाडीक याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल शितोळे व आदेश कामठे यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. हे भांडण विपुल महाडीक व रुपेश महाडिक यांनी मिटवले होते. हे भांडण मिटवल्याचा राग मनात धरून कुणाल शितोळे याने आदेश कामठे याच्या कानाखाली मारली होती. तसेच तुम्हाला लय माज आलाय का? तुम्हाला माझा इंगा दाखवितो असे म्हणाला होता. त्या ठिकाणी असणारा आकाश राखपसरे, विपुल महाडिक व रुपेश महाडिक यांना म्हणाला की, आम्ही आदेश कामठेला मारणार आहे. तुम्ही मध्ये पडू नका. यावेळी विशाल पवार याने आदेश कामठे याला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.
यावेळी विपुल महाडीक व रुपेश महाडिक घरी निघून जात असताना कुणाल शितोळे याने त्याच्या मालकीची लाल रंगाची चारचाकी गाडी वेगाने चालवून विपुल व रुपेश महाडिक यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक दिली. यावेळी चारचाकीत विशाल पवार व आकाश राखपसरे बसलेले होते.
दरम्यान, या धडकेत विपुल महाडिक व रुपेश महाडिक यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विपुल महाडिक याने दिलेल्या तक्रारीनुसार वरील चौघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, व पाटील यांनी भेट दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.