अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : तळेगाव न्हावरा रस्त्यावरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना. एका मद्यधुंद बीएमडब्ल्यू चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन बैलगाडीला समोरासमोर धडक दिली होती. या घटनेला एक महिना होण्यापूर्वीच आता याच रस्त्यावर कार व ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची घटना ढमढेरे वस्ती चौकात शुक्रवारी (ता.८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वॅग्नर कार ही न्हावरेकडून तळेगावच्या दिशेने चालली होती. तर ट्रॅक्टर हा तळेगावकडून न्हावरेच्या दिशेने चालला होता. ट्रॅक्टर चालकाने इंडिकेटर न देता रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला असता वॅग्नर कारने ट्रॅक्टरच्या मागच्या मोठ्या चाकाला धडक दिली.
दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टरचे व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत कार चालकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
तळेगाव- न्हावरा रस्त्यावर तब्बल 24 किलोमीटर अंतरापर्यंत एकही गतिरोधक नाही. त्यामुळे वाहनचालक जोरदार वेगाने गाड्या चालवत अपघातांना निमंत्रण देत आहेत. रस्त्यावरील ढमढेरे वस्ती चौकाजवळच वीस मीटर अंतरावर प्राथमिक शाळा आहे. तसेच शाळेपासून हाकेच्या अंतरावरती छोटेसे दुकान आहे.
या दुकानात लहान मुले खेळता खेळता खाऊ घेण्यासाठी येतात किंवा शालेय वस्तू आणण्यासाठी रस्ता ओलांडतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने व वाहतूक विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.