पुणे : शेअर ट्रेडींग कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळेल तसेच तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची खोटी बतावणी करून सायबर चोरट्यांनी वाघोली, वडगाव शेरी येथील दोघांना तब्बल ३२ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सायबर चोरटे पैसे हडपण्यासाठी विविध क्लुप्त्या आखत आहेत. यामुळे नागरिकांना आता आणखीनच सतर्क राहण्याची वेळ आली आहे.
याप्रकरणी वडगाव शेरी येथील २९ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत वाघोली येथील ४० वर्षीय व्याक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत वडगाव शेरी येथील २९ वर्षीय महिलेला सांगण्यात आले कि, तुमचे फेडेक्स मधून आलेले पार्सल पुढे डिलीव्हरी करीता थांबवण्यात आले आहे. त्यामध्ये पाच अवैध पासपोर्ट, एक लॅपटॉप, तीन किलो कपडे आणि साडेसहा ग्रॅम ड्रग्ज असा माल सापडलेला आहे. त्याविरोधात क्राईम ब्रँच मुंबई येथे गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना खोटे सांगून त्यांचे बँक अकाऊंट चेक करण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यातून २२ लाख ९५ हजार २२२ रुपये काढून घेतले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, फिर्यादी हे इन्स्टाग्राम अकाऊंट सरफींग करीत असतांना, एका मोबाईल धारकाने फिर्यादी यांना शेअर ट्रेडींग गुंतवणुकी संबंधितची लिंक पाठविली. आणि त्यावर क्लिक केल्यावर व्हॉटसअप ग्रुपमध्ये अॅड व्हा. ग्रुपमध्ये अॅड झाल्यानंतर शेअर स्टॉक्स गुंतवणुकी संबंधित लिंक पाठवुन त्यावर लॉगिन करण्यास सांगुन फिर्यादी यांची गुंतवणूक करून घेतली. तुम्हाला यामधील प्रॉफीट पाहिजे असेल तर २० रुपये प्रॉफीट शेअरिंग फि भरण्यास सांगून फिर्यादी यांची ९ लाख ८४ हजार ६७८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोणी कंदपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदेश शिवले करीत आहेत.