उरुळी कांचन, ता. १३ : पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील सहजपुर गावचे हद्दीत म्हेत्रे वस्तीसमोर मंगळवारी (ता. १३) साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही ट्रकचालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ट्रकमधील क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रमोद अशोक चव्हाण (वय – 41, रा. यवत चोभेमळा ता. दौंड) व अनिल नागनाथ भोसले (वय 40 रा. कोंडी जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रामदास अंकुश जाधव (रा. माळवाडी, हडपसर पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद चव्हाण हे त्यांच्या ताब्यातील पांढरे रंगाचा 407 टेम्पो हा सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे चालवीत घेऊन निघाले होते. यावेळी अनिल भोसले हे पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव दिशेने निघाले होते. यावेळी भोसले यांच्या कडून टेम्पोवरील ताबा सुटला व रस्ता दुभाजक तोडून पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या चव्हाण यांच्या टेम्पोवर जाऊन आदळला.
हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात दोन्ही टेम्पो चालकांचे जागेवरच निधन झाले. तर त्यांच्याबरोबर असलेल्या जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते विशाल म्हेत्रे उरुळी कांचन येथील कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, यवत पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने मयत व अपघातग्रस्तांना टेम्पोतून बाहेर काढले.
दरम्यान, त्या तिघांना यवत येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच जखमी जाधव यांच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून तपास यवत पोलीस करीत आहेत.
View this post on Instagram