दौंड (पुणे) : खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत शेतीमध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (ता. १४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दौंड पोलिसांनी ही कारवाई केली.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील कोडित आणि मावाडी गावात शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर आता खडकी ग्रामपंचायतीत हद्दीत अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे.
पांडुरंग सखाराम आरेकर (रा. शितोळेवस्ती नंबर 2, खडकी ता. दौंड), जीवनलाल फीपलाल शर्मा (रा. खडकी शिवार ता. दौंड), सूरेश गणपतिलाल शर्मा (सध्या रा. गुणवरेवस्ती, खडकी ता. दौड. मुळ रा. तिघेही आशिन, सरकारी हॉस्पिटल शेजारी जि. भिलवाडा राज्य राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ लाख ३६ हजार रुपयांची अफूची बोंडे असलेल्या 121 पेंढ्या जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. 1116 मधील शेतकरी पांडुरंग आरेकर व जिवनलाल शर्मा, सूरेश शर्मा यांनी त्यांच्या शेतात अफुची बेकायदेशीर लागवड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस हवालदार गोरख एकनाथ मलगुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.