उरुळी कांचन, (पुणे) : सामाईक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व दगडाने मारहाण करुन दोघांना जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुकाईवस्ती, पांढरस्थळ येथे बुधवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव आबासाहेब कांचन व कमल आबासाहेब कांचन (रा. दोघेहि मुकाईवस्ती, पांढरस्थळ, उरुळी कांचन ता. हवेली) असे मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रंजना विजय कांचन (वय – 53, रा. मुकाई वस्ती, पांढरस्थळ. उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना विजय कांचन यांची राहत असलेल्या परिसरात सामाईक विहीर आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरासमोर राहणारे उद्धव कांचन व कमल कांचन यांनी सामाईक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने व दगडाने मारहाण केली. तसेच पती विजय कांचन यांना हाताने मारहाण करुन दगडावर ढकलून देऊन दुखापत केली.
याप्रकरणी रंजना कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उद्धव कांचन व कमल कांचन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ करीत आहेत.