उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर चारचाकी गाड्यांचा किरकोळ अपघात झाल्याच्या कारणावरून तिघांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जानाई हॉटेलच्या समोरील चौकात मंगळवारी (ता. १६) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल संभाजी शितोळे (वय – ४०, व्यावसाय नर्सरी रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुळ ता. हवेली) व सुमित संजय गुंड (रा. नानगाव ता. दौंड) असे मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. तर या मारहाणीत शितीळे हे जखमी झाले आहेत. आकाश गव्हाणे, उमेष ढाके, निखील वाघमारे अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे असून त्यांच्यावर उरुळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शितोळे हे घरी असताना त्यांचा भाचा सुमित गुंड याने सांगितले की, पुणे – सोलापूर महामार्गावरील जानाई हॉटेल समोरील चौकात माझ्या कारचा अपघात झाला असून मला येथे जमलेले लोक मारत आहेत.
त्यानुसार ते दुचाकीवरून अपघात स्थळी गेले असता त्या ठिकाणी त्यांचा भाऊ किरण शितोळे हा आगोदर पोहचला होता. त्यावेळी सुमित गुंड यास आवाज दिला. तुला कोणी मारहाण व शिवीगाळ केली असे विचारले. त्यावेळी त्याने तिघांकडे बोट दाखविले. यामधील गव्हाणे हा रोडवरील अपघातातील गाडया बाजूला काढा, असे म्हणू लागला असता फिर्यादी हे पोलीसांना येवु दया असे म्हणाले.
दरम्यान, आकाश गव्हाणे व त्याचे दोन मित्र फिर्यादी यांच्याजवळ आले. त्यापैकी एकाने लोखंडी रॉड शितोळे यांच्या डोक्यात मारला. त्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त आले व चक्कर येऊन ते खाली बसले. यावेळी भाऊ किरण याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शितोळे व त्यांचा भाचा सुमित गुंड याला मारहाण केल्याप्रकरणी वरील तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.