पुणे : दोन अट्टल चोरट्यांना अटक करून ६ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल फुरसुंगी पोलिसांनी जप्त केला. मुकुंद बाळु शिंदे (वय २६, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर, मूळ गाव. मु. पो. टाकेमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली), संतोष शिवाजी पवार (वय २५, रा. शिवतेजनगर काळेपडळ, हडपसर, मूळ गाव. बोरीपार्धी केडगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, उरुळी देवाची (ता. हवेली) येथील गोडावूनमधून चोरट्यांनी इलेक्ट्रीकल सर्किट ब्रेकर, कॉम्प्युटर चिप्स, मदर बोर्ड, इलेक्ट्रीकल मिटर, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रीकल सर्किट ब्रेकर, कॉम्प्युटर चिप्स, मदर बोर्ड, इलेक्ट्रीकल मिटर, ट्रान्सफॉर्मरचे साहित्य असा एकुण ४० लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी काळेपडळ परिसरात राहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आरोपींकडून एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल व चोरीसाठी वापरलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप असा एकुण सहा लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मंगल मोढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार सतिश काळे, हरिदास कदम, नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हेमंत कामठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.