इंदापूर : पुणे, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून मोटार सायकल चोरणाऱ्या दोन अट्टल मोटारसायकल चोरांना जेरबंद करुन चोरीच्या 13 मोटारसायकल हस्तगत करण्याची कामगिरी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीसांनी बाबासाहेब नारायण राऊत (वय २७, वर्षे रा. शेजबाभुळगाव, ता. मोहोळ जि. सोलापूर) आणि गणेश भारत हेरकळे (वय २७ रा. अंकोले ता. मोहोळ जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इंदापूर, टेंभूर्णी, अकलुज, दौंड, कुर्डुवाडी व सोलापूर शहर इत्यादी ठिकाणाहून चोरलेल्या वेग-वेगळ्या कंपनीच्या 13 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी बैठक घेऊन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकास दिली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथक माहिती घेत असताना इंदापूर बस स्थानक येथून एक इसम गाडी चोरुन घेऊन जात आहे, अशी माहिती गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार प्रकाश माने आणि पोलीस हवालदार तांबे यांना मिळाली. आरोपी बाबासाहेब नारायण राऊत हा मोटार सायकल चोरी करून जात असताना त्याला मोठ्या शिताफिने पकडण्यात आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार गणेश भारत हेरकळे याच्या मदतीने 13 मोटारसायकल चोरी केल्याची कबुली पोलीसांना दिली. अधिक तपासातून आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असल्याने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक, पंकज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक राळेभात, सहायक फौजदार प्रकाश माने, पोलीस हवालदार विनोद रासकर, पोलीस हवालदार तांबे, पोलीस नाईक सलमान खान, निलेश केमदाने, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, होमगार्ड लखन झगडे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश माने हे करीत आहेत.