दौंड, (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील इलेक्ट्रिकल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून 2 लाख 16 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. 08) लोंढेमळा परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र संभाजी लोंढे (वय 34, व्यवसाय-इलेक्ट्रिकल शाँप रा. लिंगाळी ता. दौंड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र लोंढे यांचे लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील लोंढेमळा येथे आकांक्षा इलेक्ट्रिकल अँण्ड काँन्ट्रक्टर नावाने दुकान आहे. या दुकानात विद्युत रोहित्रसाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी आहेत.
रविवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 9.00 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून 2 लाख 16 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक ढूके करीत आहेत.