वाघोली, (पुणे) : वाघोली (ता. हवेली) येथील पार्वतीबाई गेनबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेले लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क (फी) दोन कर्मचारी घेऊन मागील महिनाभरापासून फरार झाले आहेत. कॉलेजमध्ये झालेल्या अपहार रकमेत विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या कोट्यवधींच्या डोनेशनची रक्कम असण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अद्याप अपहाराची पोलिसांत कसलीही तक्रार देण्यात आलेली नाही.
वाघोली परिसरात माजी आमदार रामभाऊ मोझे यांनी २००६ मध्ये पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, एमबीए, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे शिक्षण दिले जाते.
कॉलेजमध्ये अनेक शिक्षक आणि प्रशासकीय विभागात अधिकारी, कर्मचारी खूप वर्षांपासून काम करतात. कॉलेजमधील शेकडो विद्यार्थ्यांनी भरलेले लाखो रुपये प्रशासकीय विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून लांबविले आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेली लाखो रुपयांची फी कॉलेजच्या बँक खात्यात जमा झाली नाही. मागील आठ-दहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. त्यानंतर चौकशी सुरू केल्यावर फी जमा करून घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी हा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला.
अपहार केलेली रक्कम बेकायदेशीरपणे जमवलेली
अपहार केलेली रक्कम ही डोनेशन स्वरूपात घेतलेली रक्कम आहे. त्यामुळे ही रक्कम बेकायदेशीर व काळा पैसा असल्याची माहिती मिळत आहे. हा काळा पैसा अन् बेकायदा असण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अजूनही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मागील महिनाभरापासून प्रशासनाने दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला वेळोवेळी बोलावून घेत त्यांना अपहार केलेले पैसे जमा करण्यासाठी तगादा लावला आहे. या घटनेने कॉलेज मात्र चांगलेच चर्चेत आले आहे.