Pimpri crime: पिंपरी : फ्लिपकार्टच्या हबमधून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन डिलिव्हरी बॉयना अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेले तब्बल ९ लाख ४७ हजार १६० रुपये किंमतीचे ३८ मोबाईल फोन कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कामगार व त्याच्या इतर अल्पवयीन साथीदारांनी चोरल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ९१ हजार २४४ रुपयांचे २४ मोबाईल जप्त केले आहेत.
कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करणारा कामगार आशिष भाऊसाहेब भोसले (वय २२, रा. पिंपरी, पुणे) याला यापूर्वीच अटक करुन अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला इन्स्टाकार्ट सर्विस या ऑनलाईन कुरिअर कंपनीत कामाला आहे. त्यांच्या कंपनीत आरोपी आशिष भोसले हा काम करत होता. ऑक्टोबरमध्ये सुरु झालेल्या ‘बिग बिलियन डे’निमित्त अनेकांनी ऑनलाईन मोबाईल फोनची खरेदी केली होती. त्यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीवर ताण वाढला होता. याचा गैरफायदा घेऊन आरोपी आशिष भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी कंपनीच्या कार्यालयातून ९ लाख ४७ हजार १६० रुपये किंमतीचे ३८ मोबाईल फोन चोरुन नेले.
दरम्यान, चोरीचा प्रकार लक्षात येताच महिलेने वाकड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी एका आरोपीला अटक करुन अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ मोबाईल जप्त केले. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. अखेर त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपींची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता, पियुष गोविंद मोहिते (वय-२३, रा. नेवाळे वस्ती, चिखली) याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार तपास पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपींकडे एकत्रित चौकशी करुन सर्व आरोपींकडून ५ लाख ९१ हजार २४४ रुपये किंमतीचे विविध कंपनीचे २४ मोबाईल जप्त करण्यात आले. उर्वरित मोबाईलचा तपास पोलीस करीत आहेत.