वाघोली, (पुणे) : येथील शिवरकर वस्ती परिसरात असलेल्या खाणीत १२ वर्षांच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. सोमवारी (ता. २२) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अली अहमद शेख (वय १२), कार्तिक दशरथ डूकरे (वय १२, रा. दोघेही, वाघोली, ता. हवेली) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. वाघोलीतील पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
वाघोली परिसरातील शिवरकर वस्ती येथे एक पाण्याची खाण आहे. या खाणीत ५ ते ६ मुले पोहण्यासाठी गेली होते. त्यातील दोन मुले बुडाल्याची प्राथमिक माहिती पी. एम आर डी ए अग्निशमन केंद्र वाघोली येथील जवानांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागातील जवान केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक अल्ताफ पटेल, ओंकार पाटील, फायरमन विकास पालवे, महेश पाटील, मयूर गोसावी, प्रशांत चव्हाण, उमेश फाळके, सुरज इंगवले, प्रकाश मदने यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, अर्धा तासाच्या शोधकार्यानंतर एक मुलगा स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला व अग्निशमन दलाच्या मदतीने एका मुलाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.