नारायणगाव : निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील नामांकित कुस्तीपटू पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय 39) यांची शनिवारी (दि.३) हत्या करण्यात आली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. या दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रवीण मारुती पवार, मंगल मारुती पवार (दोघेही रा. केंदूर, ता. शिरूर) या दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. तर त्यांचा भाऊ मुख्य आरोपी सुनील मारुती पवार हा फरार आहे. कैलास पवार व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. नातेवाईक असलेल्या महिलेच्या अंत्यविधीसाठी शनिवारी ते मांजरवाडी येथे आले होते. अंत्यविधी झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी जुन्या भांडणातून त्यांच्यात वाद झाला.
दरम्यान, या वादानंतर कैलास पवार हे हॉटेलच्या बाहेर आले असता मंगल पवार, प्रवीण पवार या दोन भावांनी त्यांना धरले. तर सुनील पवार याने कैलास पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकारानंतर जखमी झालेल्या कैलास पवार यांना तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांची तपासाची चक्रे फिरली अन् आरोपींना अटक झाली
या हत्येप्रकरणानंतर आरोपींना अटक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने रवाना करण्यात आले. त्यानुसार, दोघांना केंदूर येथून अटक करण्यात आली तर चाकू हल्ला करणारा मुख्य आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.