उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी बेकायदा देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून २० हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
रामदास दिगंबर माने (वय ५२, रा. शिंदवणे एसटी स्टॅड जवळ ता. हवेली) व दिलीप पावसाल कोलगे (वय ५६, रा. पाटील वस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय मारूती कामठे व अमोल संजय खांडेकर यानी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १२) उरुळी कांचन पोलिसांचे पथक उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते. यावेळी हॉटेल आसरा या ठिकाणी एक इसम ओळखीच्या नागरिकांना देशी-विदेशी दारू विकत असताना दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे रामदास दिगंबर माने सांगितले. हॉटेलच्या पाठीमागे जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी १६ हजारांच्या बेकायदा देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका हॉटेलच्या पाठीमागे दिलीप पावसाल कोलगे हा दारू विक्री करत असताना आढळून आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी अमोल संजय खांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोलगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, दोघांकडून २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख व कुतवळ हे करत आहेत.