लोणीकंद (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली (ता. हवेली) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (ता. ३१) ही कारवाई करण्यात आली.
निखिल यशवंत नवले (वय २४, रा. रेल्वे स्टेशन विसापूर, ता. श्रींगोदा, जि. अहमदनगर) व आदित्य विलास देशमुख (वय १९, रा, हांडेबाई चौक, विसापूर, ता. श्रींगोदा, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ किलो २२६ ग्रॅम गांजा, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व ३ मोबाईल फोन असा एकूण १ लाख २९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना वाघोलीतील आव्हाळवाडी फाटा परिसरात दोन तरुण हे संशयितरित्या एक बॅग हातामध्ये घेऊन दुचाकीजवळ उभे असलेले दिसले. पोलिसांना पाहून ते दोघेजण त्या ठिकाणावरून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.
त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने व ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारला असता, त्या दोघांनी वरीलप्रमाणे त्यांचा नाव व पत्ता सांगितला. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेला हाताने दाबून पाहिले असता, त्यामध्ये झाडपाल्यासारखा कोणतातरी पदार्थ असल्याचे जाणवले. त्यानंतर त्या बॅगेस बाहेरुन वास घेवून पाहता, तो वास गांज्यासारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे त्या बॅगेमध्ये गांजासारखा अंमली पदार्थ असल्याचा संशय आला.
दरम्यान, त्यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता, बॅगमध्ये ४ किलो २२६ ग्रॅम गांजा, अंमली पदार्थ आढळून आल्याने निखिल नवले व आदित्य देशमुख यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, ३ मोबाईल फोन असा एकूण १ लाख २९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, नितीन घाडगे, महेंद्र कडू, ज्योती काळे, सुहास तांबेकर, सागर जगताप, अमोल ढोणे यांनी केली आहे.