लोणी काळभोर : अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी (ता.31) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
शोभा रविंद्र काळभोर (वय 42) व गोरख त्र्यंबक काळभोर (वय 41, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रवींद्र काशिनाथ काळभोर (वय 45, वडाळे वस्ती , टाकेचा माळ, रायवाडी रोड, लोणी काळभोर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशिनाथ काळभोर (वय-48, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी शोभा काळभोर व गोरख काळभोर यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी (ता.2) हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.