पुणे : भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी (दि. ०९) पहाटेच्या सुमारास पाच जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा काल मृतदेह आढळून आला. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी १६ पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी दोन संशयित आरोपीना वाघोली परिसरातून ताब्यात घेतले आहे. पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पवन शर्मा हाच असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तर नवनाथ गुरसाळे हा ड्रायव्हरचं काम करतो. तर पवन शर्मा हा खाजगी कार्यालयांमध्ये कामे करायचा. आरोपींची आणि सतीश वाघ यांची वैयक्तिक दुश्मनी असल्याची प्राथमिक माहीती पोलीस तपासात समोर आली आहे. इतर फरार आरोपींची नावंही निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
ज्या गाडीतून सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं, तशा स्वरुपाच्या आठशे गाड्या पोलिसांनी आरटीओच्या मदतीने तपासल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापूर, बीड, अहिल्यानगर अशा एकूण आठ जिल्ह्यातील गाड्यांची माहिती घेण्यात आली. गाडीची माहिती आणि टेक्निकल डेटा यावरुन आरोपींचे लोकेशन पोलीसांनी शोधले.
सतीश वाघ हे काल पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार जणांनी त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवले आणि घेऊन गेले. ही घटना एका व्यक्तीने पहिली आणि त्यानंतर या घटनेची तक्रार वाघ यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर विविध भागांत पथके रवाना करण्यात आली.
मात्र, काल सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. तसेच आरोपींच्या शोधासाठी सोळा पथके रवाना केली असून या प्रकरणी आम्ही तांत्रिक दृष्ट्या देखील शोध घेत आहोत. त्याचबरोबर सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी काही तासात तीक्ष्ण हत्याराने मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.