लोणी काळभोर, ता. 11 : अज्ञात कारणाने एका ट्रक चालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतीलकाकडे कॉलोनी परिसरात घडली असून मंगळवारी (ता.11) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
महेश गणेश वेदपाठक (वय – 33, रा. थेऊर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश वेदपाठक हा अविवाहित असून तो आईवडिलांसोबत थेऊर परिसरात राहतो. महेश हा ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. तर महेशला दारूचे व्यसन असल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, महेश वेदपाठक हा मंगळवारी (ता.11) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरातील खोलीत गेला होता. त्याने आतून खोलीचा दरवाजा बंद केला होता. महेशच्या आईने आवाज देऊन दरवाजा वाजविला. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार महेश करे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता, घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत महेश वेदपाठक हा आढळून आला. लोणी काळभोर पोलिसांनी महेशला खाली काढून लोणी काळभोर येथील एका बड्या दवाखान्यात उपचारासाठी दाखले केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
महेश वेदपाठक याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी उरुळी कांचन येथील प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. शवविच्छेदनाच अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. वेदपाठक यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दारूच्या व्यसनातून आत्महत्या केली असावी. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.