लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे दोन ट्रॅव्हल्स व एक सिमेंट वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नसली, तरी दोन्ही ट्रॅव्हल्स गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज शनिवारी (ता. 04) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास इनोवेरा शाळेजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरवरून पुण्याच्या बाजूकडे या दोन्ही ट्रॅव्हल्स निघाल्या होत्या. या दोन्ही ट्रॅव्हल्स मध्ये अंदाजे पन्नासपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इनोवेरा शाळेजवळ असलेल्या रस्ता दुभाजकाजवळ आले असता यावेळी त्या ठिकाणावरून सिमेंटची पोती असलेला टेम्पो हा पुण्याकडे जाण्यासाठी वळण घेत होता.
यावेळी सोलापूरच्या बाजूवरून पुण्याकडे निघालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे अचानकपणे टेम्पो आडवा आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स जाऊन टेम्पोवर आदळली. यावेळी पाठीमागून आलेली आणखी एक ट्रॅव्हल्स ही त्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली.
दरम्यान, या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असून, टेम्पोचे देखील थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे दोन्ही ट्रॅव्हल्समधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.