लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरून ट्रॅव्हल्स बस, बल्कर ट्रक व पिकअप या तिहेरी वाहनाचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अजित धुमाळ यांच्या घरासमोर गुरुवारी (ता.२०) पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. मात्र, तिन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदिप मधुकर गाडे (वय 42) यांनी सरकारच्यावतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅव्हल्स बस चालक कल्याण नाना गायकवाड (वय 48, रा. ओझेवाडी ता. पंढरपुर जि. सोलापुर) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324 (4) (5), मोटार वाहन कायदा कलम 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण गायकवाड हे चालक असून खाजगी ट्रॅव्हल्स बस चालविण्याचे काम करतात. गायकवाड हे सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने बुधवारी (ता.19) रात्री निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना, त्यांची बस कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत आली असता, त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खाली उतरून मोकळ्या जागेत थांबलेल्या बल्कर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघातामध्ये कोणीही गंभीर किंवा किरकोळ जखमी झालेले नाही. मात्र, बस चालक कल्याण गायकवाड यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत माने करत आहेत.