लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कंपनी व तरडे येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी मंगळवारी (ता.९) रात्री बारानंतर पुन्हा एकदा संप पुकारला होता. मात्र, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे संप टळला असून, कंपनीतून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कंपनीतून पेट्रोल-डिझेल भरून निघणाऱ्या टँकरला पोलीस बंदोबस्त दिला होता. त्यामुळे आज पुणे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची वाहतूक सुरळीत सुरु आहे.
‘हिट अँड रन’ कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी टँकर चालकांकडून संप पुकारण्यात आला होता. या कायद्यामुळे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांचा संपात सहभाग होता. या संपाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्वरित पोलिसांचा फौजफाटा घेऊन तिन्ही कंपन्यांना भेटी दिल्या.
तेव्हा चालकांनी सांगितले की, कायदे करणे अतिशय चुकीचे मानले गेले आहे. त्यामुळे असले कायदे करून चालणार नाही. कोणताही अपघात हा जाणीवपूर्वक होत नसतो. त्यामुळे आम्ही या कायद्याच्या विरोधात आहोत. त्यानंतर शशिकांत चव्हाण यांनी चालकांची समजूत काढून मध्यस्थी केली.
दरम्यान, हा कायदा फक्त टँकर चालकांसाठीच नाही तर सर्व चालकांसाठी असणार आहे. या नियमाची अजून अंमलबजावणी झालेली नाही. पेट्रोल-डिझेल ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, असे सांगितले. त्यानंतर चालकांनी संप मागे घेतला. संप घेतल्यानंतर तिन्ही कंपनीतून पुन्हा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु झाला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, विकास जगदाळे, पोलीस हवालदार संतोष सोनवणे, गोपनीय विभागाचे प्रमुख पोलीस अंमलदार रामदास मेमाणे, शिवाजी दरेकर, अजिंक्य जोजारे, आनंद बोरावके, योगेश कुंभार आदी पोलीस उपस्थित होते.
पीआय शशिकांत चव्हाण यांची सतर्कता कामी
पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे टँकर बुधवारी (ता.१०) दिवसभर वाहतूक करत होते. मात्र, ट्रान्सपोर्ट मालकांना आपला टँकर जाळतील किंवा तोडफोड करत असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला नव्हता. तेव्हा पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी टँकर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त दिला. जिल्ह्यात आज पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलची वाहतूक सुरळीत झाली. तर तिन्ही कंपनीतून आज ४० ते ५० टक्के पुरवठा झालेला आहे.
पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास ठेवू नका
असोसिएशनचे टँकर दिवसभर पेट्रोल-डिझेलची वाहतूक करत आहेत. तर ट्रान्सपोर्टच्या गाड्या मोजक्याच प्रमाणात येत होत्या. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी मध्यस्थी करून टँकर चालकांना पोलीस बंदोबस्त दिला. त्यामुळे सध्या कंपनीतून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
– सुभाष रक्षित, प्रबंधक, इंडियन ऑइल, लोणी काळभोर, ता. हवेली.