उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी, कंपन्यातील अधिकारी मोठा संताप व्यक्त करत आहेत. त्यात लग्नसराईमुळे मोठी गर्दी होत आहे. उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौकातील हातगाडीवर फळे विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे फळे घेणारे मोठ्या प्रमाणात थांबतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. वास्तविक, याकडे पोलिस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, याकडे त्यांच्याकडून सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
परिसरातील इतर भागातही वाहतूक कोंडीतून मार्ग शोधणे वाहनचालकांसह नागरिकांना जिकरीचे झाले आहे. सततची वाहतूक कोंडी उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? वाहतूक कोंडी का सुटत नाही, निवडणुकांचे करायचे काय असा सवाल नागरिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांचा आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सातत्याने होत असल्याने वाहनांच्या रांगा अगदी दोन, तीन किलोमीटरवर लागत आहे. उरुळी कांचन गावात जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तळवाडी चौकातून जेजुरीकडे जाण्यासाठी अगदी एक ते दीड तास लागतो. कामगार, शेतकरी, नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, उद्योजक आदींचे हाल होत आहेत. पोलिस व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेच वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
उरुळी कांचन पोलिस, उरुळी कांचन ग्रामपंचायत व एनएचएआय (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) योग्य ते नियोजन करत वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने पादचारी, व्यावसायिक, रुग्णालय, बँक, हॉटेल येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना मार्गक्रमण करताना अडचण येते. बेशिस्त वाहन चालक आणि पोलिसांच्या नियोजनाचा अभाव यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
पुणे-नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीला तसेच पुणे-नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक, कामगार व्यक्त करत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण होणार असे सांगितले जाते. परंतु, या मार्गाचे काम काही होताना दिसत नाही. काही नेत्यांनी, मंत्र्यांनी आश्वासने दिली तरीही या महामार्गाचे काम काही सुरू होत नाही हे वास्तव आहे. या मार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? असा सवालच सोशल मीडियातून विचारला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.
अवजड वाहनांवर कारवाई नाहीच
पुणे, सोलापूर, लातूर, मराठवाडा, कर्नाटक या भागांना जोडण्यासाठी हा पुणे-सोलापूर महामार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच अवजड वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनांमध्ये कंटेनर, ट्रेलर, टँकर, बस आदी वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. संबंधित विभाग, प्रशासन काहीच करत नाही, असा आरोप कामगार, नागरिकांचा आहे.
उरुळी कांचनसह परिसरात वाढतीये वाहनांची संख्या
उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतूक नियोजनातील समस्या मात्र कायम आहे. वाहतूक कोंडीत यामुळे भरत पडत आहे. प्रयागधाम व कोरेगाव मूळकडे जाणाऱ्या चौकात, तसेच एलाईट चौक, तळवाडी चौक, मुख्य बाजारपेठ येथील वाहतूक कोंडी सुटता सुटेना अशी परिस्थिती आहे. तसेच हा परिसर वाहनांनी नेहमी गजबजलेला असतो.
बेशिस्त वाहनचालक जोमात, वाहतूक कोमात
उरुळी कांचन व परिसराचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला आहे. या ठिकाणी कायमच नागरिक अन् वाहतुकीच्या वर्दळ सुरू असते. या रस्त्यातून नागरिकांना मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. त्यात काही बेशिस्त नागरिक चारचाकी वाहन वाटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत असते.
वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी
याबाबत बोलताना बोरीभडक येथील व्यावसायिक जीवन आतकिरे म्हणाले, “मागील तीन दिवसांपासून उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी होत आहे. जाताना व येताना या ठिकाणी वाहतूक पोलीस काम करतात. मात्र, त्याच्याच बाजूला मोठ्या प्रमाणावर यवतच्या बाजूला जाणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच तीनही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने थांबलेली असतात. मात्र, वाहतूक शाखेचे पोलीस मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी
वाहतूक कोंडीची कारणे
-पोलिसांच्या नियोजनाचा अभाव
-अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
-खासगी वाहनधारक आणि ट्रॅव्हल्स, रिक्षा चालकांनी रोडचा घेतलेला ताबा
-रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी चालकांचे थांबे
-बेशिस्त वाहन चालक
-बेशिस्त वाहन पार्किंग
-अधिकृत पार्किंगचा अभाव
-विरुद्ध दिशेने प्रवास.
स्वतः जाऊन वाहतूक कोंडीचा आढावा घेणार
उरुळी कांचन येथील चौकात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना कायमच सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चौकात तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पोलिसांच्या नेमणुका केल्या आहेत. दोन दिवसात स्वतः जाऊन वाहतूक कोंडीचा आढावा घेणार आहे. वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल यासाठी उपाययोजना करणार आहे. तसेच नागरिकांना दैनंदिन होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– पंकज देशमुख, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक.