उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन शहराच्या वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहतूक कारणीभूत ठरत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. तरीही त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढलेली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडते ती चौकांमधील अनधिकृत थांब्यांची.
या अनधिकृत थांब्यांमुळे शहरातील बहुतांश चौकांचाच श्वास कोंडला गेला आहे. विशेषत: या चौकांमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असतानाही त्यांच्यासमोर रिक्षाचालक, खासगी ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहने, विक्रेते वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशारितीने थांबलेले असतात.
परंतु, त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी, १५ नंबर चौक, शेवाळेवाडी मार्केट परिसर, कवडीपाट रस्ता, लोणी स्टेशन, एमआयटी चौक, कुंजीरवाडीतील सरकारी दवाखान्यासमोर, उरुळी कांचन येथील एलाईट चौक, तळवाडी चौक या प्रमुख चौकांचा श्वासच कोंडला आहे.
लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरातील रस्ते प्रशस्त आहेत. विशेषत: मोठ्या संख्येने रिक्षा त्यांचे थांबे सोडून थांबलेल्या असतात. लोणी काळभोर येथील एमआयटी चौकाला तर अनधिकृत रिक्षाचालकांचाच गराडा पडलेला आहे. एमआयटी चौकात सेवा रस्त्यावर तसेच चौकात या रिक्षांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढू लागले आहे. लोणी काळभोर येथील सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या एमआयटी चौकात होते. परंतु, या वाहतूक कोंडीला सर्वाधिक जबाबदार वाहनचालकांचा बेशिस्तपणा जसा कारणीभूत ठरतो, तसाच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणाही तितकाच कारणीभूत ठरतो आहे.
उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात अधिकृत रिक्षाथांबा सोडून अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. सोलापूरच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर खासगी प्रवासी वाहनांसह खासगी ट्रॅव्हल्सही थांबतात. या थांबलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रहदारीसाठी रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते.
वाहतूक पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
लोणी स्टेशन, एमआयटी चौकात, उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात नियमित शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असतात. परंतु, या वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षाचालक वा विक्रेत्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांचे लक्ष केवळ विनाहेल्मेट दुचाकी, विनासीटबेल्ट कारचालक, अवजड वाहन यांच्यावर असते. पोलिसांच्या या सोईस्करपणामुळे चौकांचा अनधिकृत थांब्यांमुळे श्वास कोंडलेलाच आहे.
पोलीस सकाळपासूनच असतात कार्यरत
सध्या वाहतूक कोंडीतून उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या व उरुळी कांचन येथील उरूस व आठवडे बाजार हे एकाच दिवशी आल्याने रविवारी संध्याकाळी सहानंतर वाहतूक कोंडी थोड्या प्रमाणात झाली होती. वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी पोलीस सकाळपासूनच कार्यरत असतात.
– शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन.
सर्व रस्ते वाहतूक कोंडीने होताहेत जाम
अरुंद रस्ते आणि त्यात वाहतूक कोंडी त्यामुळे उरुळी कांचन येथील सर्व रस्ते वाहतूक कोंडीने जाम होत आहेत. सकाळी उठलं आणि रात्री घरी परतायचं म्हटलं की, वाहतूक कोंडी आमच्या पाचवीलाच पूजलेली आहे.
– राज गायकवाड, उरुळी कांचन, (ता. हवेली)