पुणे : जिल्ह्यातील हवेली, मुळशी, मुळशी, आंबेगांवसह सात तालुक्यात पुढील तीन दिवस पर्यटनबंदी करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी वरील आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील किल्ले, धबधबे आणि पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिघात पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 14 जुलै ते 17 जुलै या कालावधीत लोकांना किल्ले आणि पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण जिल्हयात आय.एम.डीच्या रेड, ऑरेंज व येल्लो अतिवृष्टीच्या इशा-यामुळे गड, किल्ले पर्यटन स्थळांवरील अपघात रोखण्यासाठी गिर्यारोहकांना आणि पर्यटक, नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता, जिल्हयातील ग्रामीण भागातील संबंधित ठिकाणी हे आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या तालुक्यात आहे प्रतिबंधात्मक क्षेत्र :
९. हवेली : सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक
२. मावळ : किल्ले लोहगड, किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, डयुक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधी वरेखिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा,कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर
३. मुळशी : अंधारबन ट्रेक,प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड,
४. भोर : रायरेश्वर किल्ला
५. वेल्हा : किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट
६. जुन्नर : किल्ले जीवधन
७. आंबेगांव : बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट, गणपती मार्ग)
असे असतील निर्बंध :
१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद टिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
२) पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे यावर निर्बंध
३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
४) पावसामुळे धोकादायक झालेली टिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी
काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
६) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
८) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे
साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे,
असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
१०) सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टम वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.
११) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
१२) धबधब्याच्या १ किलोमीटर मनाई आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)
दरम्यान, पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने आता पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झाली आहे. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे अवाहन पुणे मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.