Somatane Toll | चिंचवड, (पुणे) : जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल (Toll Plaza) बंद करा, या मागणीसाठी सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने आवाहन केल्याने मावळवासीय रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे हे उपोषण तर दुसरीकडे आज हे आंदोलन करत टोल नाक्यालगतच नागरिक एकत्र आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ द्वारे अनिवार्य आहे..!
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हा टोल नाका आहे. सोमाटणे आणि वरसोली असे दोन टोल नाके ३१ किलोमीटरच्या अंतरात आहेत. प्रत्यक्षात ६० किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा, असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ द्वारे अनिवार्य आहे. म्हणूनच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली.
२००६ मध्ये हा टोल नाका सुरु झाला असून २०१९ मध्ये त्याची मुदत संपलेली आहे, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शिवाय ८०० कोटी वसूल करण्याची मुभा असताना प्रत्यक्षात अडीच हजार कोटी वसूल केल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. म्हणूनच सोमाटणे टोल हटाओ कृती समितीने बेकायदेशीर सुरु असलेली वसुली बंद करावी, अशी मागणी घेऊन अनेकदा आंदोलन छेडली आहेत.
काही महिन्यांपूर्वी या टोल नाक्यावरुन स्थानिकांना विनाटोल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र कालांतराने टोल आकारणाऱ्यांनी पुन्हा वसुली सुरु केली. त्यामुळेच आता पुन्हा एकदा सोमाटणे टोल हटाओ कृती समिती आक्रमक झाली आहे. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु केलं तर मंगळवारी मावळवासीय थेट रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्या पुणे मुंबई महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वादावादी आणि भांडणंदेखील होऊ नये म्हणून या टोल नाक्याजवळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!