Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे) : जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्पर्धा ही असलीच पाहिजे. स्पर्धेतला पहिला किंवा दुसरा क्रमांक हा महत्त्वाचा नसून आपण स्पर्धेत ताकदीने उतरलो आहोत आणि आपण स्पर्धा जिंकू शकतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यावश्यक आहेत, असे केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२३-२०२४ च्या अंतर्गत बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा सोमवारी (ता.११) मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र जगताप बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोणी काळभोरच्या उपसरपंच प्रियंका काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोणी काळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, ग्रामपंचायत सदस्य सविता लांडगे, गफूर शेख, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र जगताप पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कमी दिला जातो. त्यामुळे पाठीमागील काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यास व खेळाकडे लक्ष दिले जात नव्हते. मात्र, आता पालक हुशार झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जाणून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखविली आहे.
स्पर्धेत सुमारे ४० शाळांचा सहभाग
बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो,भजन, लोकनृत्य, लेझिम इत्यादी खेळांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये लोणी काळभोरसह थेऊर होळकरवाडी व शेवाळेवाडी या चार केंद्रातील सुमारे ४० शाळांनी सहभाग घेतला होता. तर या चार केंद्रातील ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज कपूर मेमरी हायस्कूलचे प्राचार्य सिताराम गवळी, लोणी काळभोरची विस्तार अधिकारी भरत इंदलकर, चिंतामण अध्वैन, मारुती कापरे, मारुती हिंगणे, मुख्याध्यापक कांचन वेदपाठक, मीना नेवसे, नजमा तांबोळी, रोहिदास मेमाणे, हालीमा शेख, संतोष जगताप, चंद्रकांत जगताप, दिगंबर सुपेकर, नवनाथ पानमंद, राजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.