पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवऱ्याचे बाहेरील महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना येरवडा येथील नागपुर चाळीत ७ मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मोनिका मधुकर ओव्हाळ (वय-३८) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पतीविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत सुरेश चाबुकस्वार (वय-३१, रा. नागपुर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय-४५, रा. नागपुर चाळ) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर याचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध होते. आरोपी फिर्यादी यांच्या बहिणीला सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आहिरे करत आहेत.