उरुळी कांचन, (पुणे) : येथील रेल्वे स्थानकातील तिकिट काढण्याचा प्रिंटर बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. 16) सकाळी हा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांना बिनातिकीट प्रवास करावा लागला आहे. यावेळी काही नागरिकांनी तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते, मात्र ते परत केले नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
उरुळी कांचन येथून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या असते. अशातच आज सकाळी स्थानकातील तिकिटाचा प्रिंटर बंद पडला. त्यामुळे उरुळी कांचन येथील रेल्वे स्थानकात कामगार, नोकरदार तसेच अन्य प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. अनेक नागरिकांना सोलापूर, दौंड, पुणे आणि आसपासच्या स्थानकावर जाण्यासाठी बिनातिकीट प्रवास करावा लागला आहे. बिनातिकीट प्रवास केला तर तिकीट चेकरने (टीसी) पकडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रवाशांकडून उरुळी कांचन रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांची उर्मट भाषा
याबाबत रेल्वे स्थानकातील तिकीट काढणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला नागरिकांनी विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कोणतीही उत्तरे न देता पडदा लवून घेतला. तसेच तुम्ही या ठिकाणी न थांबता बाजूला जाऊन उभे रहा अशी उर्मट भाषा वापरली.
मी दररोज नोकरीनिमित्त उरुळी कांचन येथून पुण्यात तिकीट काढून जातो. जर मला आज पुणे स्थानकावर तिकीट नाही म्हणून पकडले तर याला जबाबदार कोण?
सचिन लोंढे, प्रवासी, उरुळी कांचन, (ता. हवेली)
याबाबत उरुळी कांचन येथील रेल्वेचे मुख्य प्रबंधक मनोज सालोदकर म्हणाले, “तिकीट काढण्याचा प्रिंटर बंद होता ही बाब खरी आहे. अचानक प्रोब्लेम आल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. सध्या तिकीट काढण्याची मशीन पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.