युनूस तांबोळी
शिरुर : शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तालुक्याच्या उद्योग, व्यवसायात प्रगती केल्यानंतर जनतेने त्यांना तीन वेळा खासदार म्हणून निवडून दिले. या काळात त्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले. त्यानंतर मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाने खचून न जाता, जनतेमध्ये राहून ते पुन्हा जनतेसाटी राजकारणात सक्रिय झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असल्याने त्यांना नुकतेच म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले. त्यातून आढळरावांचा शिरूर लोकसभेसाठीा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगू लागली. मात्र, खासदार म्हणून जनतेने तीन वेळा संसदेत पाठविले. यापुढेही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी शिरूर लोकसभा लढविणारच यावर ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व करणारे एकमेव खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव यांना ओळखले जाते. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेत राहणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांना म्हाडाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याची चर्चा आहे. या निवडीचे स्वागत आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी, चिचोंडी येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत केले. दरम्यान, म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे शिरूर लोकसभेचे तिकीट कापल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव बोलत होते.
पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडली, ही जनतेत राहून त्यांच्यासाठी केलेल्या कामाची पावती आहे. याचा परिणाम २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीवर पडणार नसून, मी महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढविणार आहे, असा दावा आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. या पदामुळे पुन्हा जोमाने जनतेसोबत काम करण्याचे बळ मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले. निवडून दिलेला शिरूरचा खासदार गेल्या पाच वर्षांपासून जनतेला दिसलेला नाही. मात्र, माझा पराभव झाल्यावर देखील मी जनतेसाठी विकासाची कामे दिवसरात्र करत आहे. त्याचा फायदा मला शिरूर लोकसभेत होणार असून, जनता पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून विकासाची कामे करून घेत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जनतेच्या विकासासाठी पद…
‘गृहनिर्माण’च्या माध्यमातून गोरगरीबांना घर मिळावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यासाठी मला पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. गोरगरीब जनतेसाठी या संधीचे सोने करणार आहे. यापुढेही शिरूर लोकसभा लढविणार यात कोणीही शंका घेऊ नये. गेल्या दीड वर्षापासून म्हाडाचे अध्यक्षपद मला द्यायचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनात होते. पदाच्या माध्यमातून विकासकामे करण्यासाठी काम करायचे असून, यापुढेही जनता मला साथ देणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.