उरुळी कांचन, (पुणे) : खेळता – खेळता घरापासून हरवलेला 3 वर्षीय अल्पवयीन मुलगा सोशल मिडिया, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेमुळे अवघ्या तासाभरात आई-वडिलांच्या कुशीत परतला आहे. सोमवारी (ता. 15) सायंकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. कल्प हुसेन खान (वय – 03, रा. जुन्या महादेव मंदिराशेजारी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे सापडलेल्या परप्रांतीय मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे आई-वडील हे परप्रांतीय असून उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या महादेव मंदिराशेजारी राहतात. वडील हे एका खाजगी ठिकाणी काम करतात. सोमवारी (ता. 15) सायंकाळी मुलगा हा खेळत – खेळत महात्मा गांधी विद्यालयाच्या बाजूला असलेल्या जिजाऊ सभागृह येथे पोहोचला. याठिकाणी खेळत असताना त्याला अचानक आईची आठवण झाली व तो मोठ्याने रडू लागला. यावेळी तेथून काही तरुण निघाले होते. त्या तरुणांनी त्याला नाव विचारले. मात्र, त्याला मराठीत बोललेले काहीच समजत नव्हते. त्यानंतर तरुणांनी त्या मुलाला उरुळी कांचन पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलाचा फोटो त्याच्या माहितीसह व्हाटसअॅप या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून सर्वत्र पाठवली. त्यानंतर एका तासाच्या आत सदर मुलगा हा उरुळी कांचन येथील असल्याची माहिती अमित कांचन यांना एका नागरिकाने दिली. त्यानुसार अमित कांचन यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
दरम्यान, यावेळी उरुळी कांचन भाजपा शहराध्यक्ष अमित कांचन, खुशाल कुंजीर, हरीश उर्फ पप्पू कांचन, पोलीस हवालदार पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस नाईक अजित काळे यांनी त्या मुलाला राहत असलेल्या ठिकाणी पालकांच्या स्वाधीन केले.