पुणे : शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील अशोकनगर भागात गुरुवारी पहाटे एका ओैषध विक्री दुकानाला आग लागली. या आगीत ओैषध विक्री दुकानातील ओैषधांच्या बाटल्यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. आग भडकल्याने या आगीची झळ शेजारील दुकानांना बसली.
दरम्यान, दुकान बंद असल्याने सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीची झळ अशोकनगर भागात मेडीक्युअर मेडीकल स्टोअर्स आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ओैषध विक्री दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या ओैंध केंद्रातील अधिकारी शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग भडकली होती.
दरम्यान, प्रसंगावधान राखत जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ओैषध विक्री दुकानाशेजारी असणाऱ्या दोन दुकानांना आगीची झळ पोहोचली. ओैषध विक्री दुकानातील ओैषधांच्या बाटल्या, तसेच अन्य साहित्य जळाले. सुदैवाने दुकानात कोणी नव्हते.
याठिकाणी आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.