पुणे : औंधमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. औंध येथील मंगलम कन्स्ट्रक्शन साईटसमोर एका टोळीने गुरुवारी पहाटे ५. १५ च्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या तिघाजणांना लोखंडी रॉडने मारत गंभीर जखमी केले आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. औंध येथील मंगलम कन्स्ट्रक्शन साईटसमोर पहाटे ५. १५ च्या सुमारास एका टोळक्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारून गंभीर जखमी करीत पैशांची मागणी करण्यात आली. तिघांनी विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही केला. या हल्ल्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, त्यांना रुग्णालयाने ‘ब्रेन डेड’ घोषित केले आहे.
या दरम्यान, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. यामधील तीन अल्पवयीन आहेत. तिसऱ्या आरोपीला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी जय सुनील घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याला अटक केली आहे. त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याबरोबरच्या तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एका मुलावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी श्रेयस सतीश शेट्टी (वय ३०, रा. अश्विनी सोसायटी, औंध रस्ता, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे.
या हल्ल्यात शेट्टी यांच्यासह समीर रॉय चौधरी (वय ७७, रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) आणि रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय ३८, रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध)हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औंधमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी यांच्या मेंदूला गंभीर मार लागला असून त्यांना रुग्णालयाने मेंदू मृत घोषित केले आहे. मात्र, त्याचा अधिकृत वैद्यकीय अहवाल रुग्णालयाकडून पोलिसांना पाठविण्यात आलेला नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी सांगितले.
चौधरी हे टाटा मोटर्समधून सेवानिवृत्त झालेले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व आरोपींना दारूचे व्यसन असून ते नशेसाठी लूटमार करीत असतात. फिर्यादी शेट्टी हे गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता सायकलवरून मोबाईल शॉपी रस्त्यावरून जात होते. मोबाईल शॉपीजवळ चार जण घोळक्याने उभे होते. त्यांच्याकडे एक दुचाकी होती. त्यांनी फिर्यादी शेट्टी यांना अडवित पैशांची मागणी केली. त्यांनी आपल्याजवळ पैसे नाहीत असे सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांच्या खिशात हात घालून पैसे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. मात्र, शेट्टी यांनी हा वार चुकवला. ते तेथून जीव वाचवून ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.
आरोपींनी या तिघांना लूटमार करून मारहाण केल्यानंतर दुचाकी आणि रिक्षामधून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त विजयकुमार मगर, चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. चित्रीकरण, तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून चोरट्यांचा माग काढण्यात आला. पसार झालेल्या चोरट्यासह अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.