तुषार ओहोळ
बारामती: बारामती ते मेखळी रस्त्यावर एका अज्ञात वाहन चालकाने चुकीच्या बाजूने मोटारसायकल चालवून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एका अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद छटाक्या पवार ( वय- 42 वर्षे, धंदा मजुरी, रा. कटफळ ता. बारामती जि.पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुणवडी गावच्या हद्दीत विद्यानगरपाटी येथे बारामती ते मेखळीकडे जाणाऱ्या रोडवर एका अज्ञात मोटारसायकल चालकाने फिर्यादींच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या पत्नी सुनिता यांच्या डाव्या हाताला मुक्का मार लागला. तसेच मणक्याला मार लागुन फ्रॅक्चर झाले आहे. तसेच फिर्यादीच्या उजवे काखेजवळ दुचाकीचा फुटरेस्ट लागल्याने फिर्यादी यांना काही अंतरावर फरफटत नेले. त्यामुळे गंभीर जखम होवुन त्यांना टाके पडलेले आहेत. तसेच फिर्यादी यांची मुलगी सोनाक्षीला देखील उजव्या पायाला मुका मार लागला आहे. या अपघाताची खबर न देताच तो अज्ञात इसम निघुन गेला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करत आहेत.