दौंड (पुणे) : दौंड-कुरकुंभ रस्त्यावर लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत पोकलेनमधील डिझेलची चोरी करणाऱ्या बाप-लेकासह तिघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बहादूर बबन चव्हाण (वय ६५), कुंडलिंग बहादुर चव्हाण (वय ३२, रा. दोघेही जिरेगाव ता. दौंड) व दिनेष सुरक्षा पवार (वय २१, रा. सांगवी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय बबन कोठावळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना पोलीस हवालदार ढूके यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दौंड कुरकुंभ रोडवर लिंगाळी गावचे हद्दीत दोन जण रस्त्याचे काम करणारे पोकलेनमधील डिझेल चोरी करुन घेऊन जाणार आहेत.
यावेळी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन जण हे एका दुचाकीवर प्लास्टिकचे कॅन्ड घेऊन जात असताना दिसले. त्यांना पकडून ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी बहादूर चव्हाण व दिनेश पवार असे सांगितले. तसेच हे डिझेल मुलगा कुंडलिंग चव्हाण याच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यांच्याकडून पोलिसांनी ४ हजार १४० रुपयांचे ४५ लिटर डिझेल, ५० हजार रुपये किंमतीची टी. व्ही. व दुचाकी असा ५४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ढूके करत आहेत.