उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन -शिंदवणे रोडवरील चिंतामणी वॉशिंग सेंटर जवळ तरुणावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केलेल्या आरोपींचा शोध घेण्यास उरुळी कांचन पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोणी काळभोर येथील तिघांना अटक केली असून दोघेजण फरार असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
आरोपींसोबत फिर्यादीच्या पत्नीला बोलू देत नसल्याच्या कारणावरून पाच जणांनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा कट रचला आणि कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी समीर आसलम शेख (वय – 25), चेतन सोमनाथ जाधव (वय-18), निगम उर्फ नॅगी जगदीश निशाद (वय -19, सर्व रा. लोणी काळभोर ता. हवेली) यांना अटक केली असून या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे- उरुळी कांचन रोडवरील चिंतामणी वॉशिंग सेंटर जवळ सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र हे कामासाठी निघाले होते. यावेळी फिर्यादी हे दुचाकी गाडी चालवत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी मध्यभागी बसलेल्या अज्ञात तरुणाने ऊस तोडीच्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या बाजूने अचानक वार केला होता. त्यानंतर ते त्या ठिकाणावरून पळून गेले होते. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा उरुळी कांचन पोलीस तपास करीत असताना कोणताही पुरावा तसेच धागेदोरे नव्हते. तरीही उरुळी कांचन पोलीसांनी कौशल्यपुर्ण तांत्रिक तपास करत सदर गुन्ह्यातील वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फिर्यादी हा त्याच्या पत्नीस आरोपी सोबत फोनवर बोलू देत नसल्याच्या व संशय घेत असल्याचे कारणावरून पाच जणांनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार फिर्यादीस कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दाखल गुन्ह्यात भा.दं.वि. कलम 109 आणि 61(2) ची वाढ करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार अजित काळे, उध्दव गायकवाड, पोलीस अंमलदार दिपक यादव, सुमित वाघ, अमोल खांडेकर, अश्वजित मोहोड यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे करीत आहेत.