कात्रज : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. मोहोळ, धंगेकर आणि मोरे यांची लढत झाल्यास पुणे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच तीन माजी नगरसेवक आमनेसामने पाहायला मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने सर्वप्रथम उमेदवाराची घोषणा केली. त्यानंतर गुरूवारी (ता. २१) महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम ठोकणारे माजी नगरसेवक वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. अशातच त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्यामुळे तीन माजी नगरसेवकांमध्ये लढत होणार, हे निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊनच मी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहे, न लढविल्यास ज्या लोकांनी माझ्यासाठी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यांचा हा अपमान असेल. पुणे शहराचा विकास आणि कात्रज पॅटर्न राबविणे हे माझे मुख्य ध्येय असणार आहे. कोरोना काळात मी केलेले काम पाहून लोक मला मतदान करतील, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.