लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर येथील ॲथलेटिक्स क्लबचे सदस्य व तीन सायकल वेड्या मित्रांनी पुणे ते आयोध्या हे 1 हजार 560 किलोमीटर अंतर सायकल वरून 7 दिवस 6 तासांमध्ये पूर्ण करून श्री राम लल्लांचे दर्शन घेतले. तसेच “मुली वाचवा मुली शिकवा व सायकल चालवा पर्यावरण वाचवा” हा संदेश देत सगळ्या समाजापुढे व तरुणांपुढे एक अतिशय चांगला आदर्श निर्माण केला आहे.
हडपसर ॲथलेटिक्स क्लबचे सदस्य कॅप्टन महेश लाकडे, प्रशांत घुले व उमेश टकले या तीन सायकल वीरांनी पुणे ते अयोध्या अतिशय अवघड व खडतर असा प्रवास केला आहे. त्याच्या या प्रवासाचे परिसरात कौतुक केले जात असून ठिकठीकाणी स्वागत केले जात आहे.
हडपसर ॲथलेटिक्स क्लबचे सदस्य कॅप्टन महेश लाकडे, प्रशांत घुले व उमेश टकले हे 5 नोव्हेंबरला पुण्यावरून अयोध्येच्या दिशेने सायकलवर निघाले होते. यावेळी त्यांनी नाशिक, इंदोर मार्गे सायकल प्रवास सुरु केला. हा प्रवास त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय होता. या प्रवासात त्यांना अनेक सुंदर अनुभव तसेच अनेक चढ-उतार, नवीन मित्र आणि अनुभव घेत 12 नोव्हेंबर रोजी दुपारी रामजन्मभूमी अयोध्या येथे सांगता झाली.
या तिघा सायकल वीरांना पूर्ण प्रवासादरम्यान गाडीचा सारथी आदेश कन्हेरकर तसेच कुटुंबातील व मित्र परिवाराने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन व पाठबळ यामुळे ही मोहीम यशस्वी पार पडली असे या तिघांनी सांगितले. केवळ सायकलिस्ट या नात्याने लासलगाव सायकलिस्ट क्लब, शिरपूर सायकलिस्ट क्लब यांनी केलेले सहकार्य, सिन्नरचे विनोद दादा शितोळे व धुळ्याचे आमदार कुणाल बाबा पाटील, पै. राजेंद्र वालचंद शिंदे, भूषण पाटील व त्यांचे सहकारी तसेच शिरपूरचे गौरव सोनावणे व आयोध्येचे भाजप नगराध्यक्ष अनुराग त्रिपाठी यांनी अगदी योग्य वेळी केलेले सहकार्य व स्वागत हे खूप मोलाचे ठरले.
दरम्यान, कदमवाकवस्ती येथे आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सतीश काळभोर, त्यांच्या पत्नी कदमवाकवस्तीच्या सदस्या रुपाली काळभोर, अविनाश नाळे, व त्यांच्या मित्र परिवारातर्फे तिन्ही सायकलस्वरांचा सत्कार करण्यात आला.