लोणी काळभोर, (पुणे) : डोणजे परिसरातील शासकीय ठेकेदार बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर यांचे अपहरण करून त्यांचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व हवेली पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी हा अद्याप फरार आहे.
शुभम पोपट सोनवणे (वय – 24, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलींद देवीदास थोरात, (वय 24, रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) व रोहित किसन भामे (वय 22, रा. डोणजे ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (रा. डोणजे ता. हवेली) हा मुख्य सूत्रधार असून तो अद्याप फरार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 15) हवेली पोलीस ठाण्यात सोनाली विठ्ठल पोळेकर यांचे वडील विठ्ठल पोळेकर हे बांधकाम व्यावसायिक असून शासकीय ठेकेदार आहेत. गुरुवारी (ता. 14) विठ्ठल पोळेकर हे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून सिंहगड किल्ल्याच्या दिशेने मॉर्निंग वॉक करीता गेले होते. ते पुन्हा घरी नेहमीच्या वेळेत सकाळी साडेसात वाजता आले नाहीत. म्हणून हवेली पोलीस ठाण्यात मिसींग खबर नोंदविण्यात आली होती.
विठ्ठल पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका घेतला होता. त्या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याने विठ्ठल पोळेकर यांच्याकडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कंपनीची चारचाकी कार मागितली होती. त्याची पुर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खुन करण्याची धमकी दिली होती. अशी माहिती प्रशांत पोळेकर यांच्याकडून मिळाली. योगेश ऊर्फ बाबु भामे हा त्याचा मोबाईल बंद करून गावात नसल्याने त्यानेच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने योगेश भामे, रोहित भामे व त्यांच्या साथीदारांचे मदतीने केले असल्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये विठ्ठल पोळेकर यांच्या घरासमोरून एक पांढ-या रंगाची स्विफ्ट कार सिंहगड किल्ल्याच्या दिशेने जाऊन काही मिनीटांमध्ये पुन्हा माघारी डोणजे बाजूकडे गेली. कारची माहिती घेतली असता डोणजे गावातील गणेश मुरलीधर चोरमले यांची असून ती कार दोन दिवसापासून योगेश भामे हा वापरत होता. योगेश भामे याचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला तो मिळून आला नाही. त्याचा मोबाईल बंद होता, त्याचे कुटुंबीय यांना देखील तो कोठे गेला, याबाबत माहिती नाही अशी माहिती मिळाली. कारचा सीसीटीव्ही द्वारे पाठपुरावा केला असता, सदर स्विफ्ट कार नाशिक बाजूकडे गेली असून कारमध्ये तीन इसम त्यामध्ये योगेश ऊर्फ बाबु भामे हा कार चालवित असल्याचे आढळले. त्याच्या सोबत शुभम सोनवणे व मिलींद थोरात असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः त्यांच्या पथकासह नाशिक येथे जाऊन गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला. यावेळी आरोपी हे रेल्वेने उत्तर भारताकडे गेल्याचे निष्पन्न झाले. आर.पी.एफ.नाशिक रोडपोलीस ठाण्याची मदत घेवून तिन्ही आरोपी हे गोरखपूरकडे जाणा-या रेल्वेने गेले असल्याची माहिती समजली. त्यानंतर जबलपूर मध्यप्रदेश यांच्याशी संपर्क साधून एक पथक जबलपूर येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर जबलपूर मध्यप्रदेश यांच्या मदतीने तीन आरोपींचा शोध घेतला असता यातील शुभम सोनवणे, मिलींद थोरात या दोघांना अटक केली.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा खून हा मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबु भामे यांनी संगणमताने करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. रोहित भामे याला शुक्रवारी (ता. 15) अटक करण्यात आलेली असून त्याला गुरुवारपर्यत (ता. 21)पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याच्यावर शरीराविरूद्धचे एकूण 09 गुन्हे दाखल असून सदरचे गुन्हे हे आर्थिक लाभासाठी केलेले आहे. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असून आरोपी शुभम सोनवणे याच्यावर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे 02 गुन्हे दाखल आहेत. आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याचा शोध चालू आहे.