पुणे : आयशर टेम्पोचा अॅडवान्स गिअर टाकून गाडीच्या इंजिनचे नुकसान केल्याने मालकाने कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली. याचा राग आल्याने चालकाने टेम्पोच्या मालकावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आंबेगावजवळील भूमकर चौकात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत ट्रकमालक शिवाप्पा आडागळे (वय ४२, रा. आदर्शनगर कॉलनी, किवळे) हे जखमी झाले आहेत. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी दिगंबर गायकवाड (रा. डुडुळगाव, आळंदी रोड, मोशी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीकडे ३ आयशर टेम्पो आहेत. मागील ३ वर्षांपासून दिगंबर गायकवाड हा त्यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी त्याने अचानक आयशर टेम्पोचा अॅडवान्स गिअर टाकला. त्यामुळे गाडीच्या इंजिनचे नुकसान झाले. त्यामुळे फिर्यादींनी त्याला कामावरुन काढून टाकण्याचे ठरविले. हे समजल्यावर तो एक टेम्पो घेऊन गेला, तो परत आलाच नाही.
दरम्यान, चालक परत न आल्यामुळे फिर्यादींनी त्याला फोन केला. त्यावेळी त्याने ‘मी गाडी घेऊन येत नाही, तुम्हाला येऊन भेटतो’, असे सांगितले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिगंबर गायकवाड याने फोन करुन दत्ता करमले याच्या गॅरेजमध्ये बोलावल्याने ते तेथे गेले. तेथून तो आयशर टेम्पो घेऊन जात असल्याने फिर्यादींनी त्याला विरोध केला. तेव्हा गायकवाड याने फिर्यादीच्या डोक्यात टोकदार शस्त्राने मारले.
या वेळी दोघांमध्ये वाद झाले. दत्ता करमले व कामगार सुनिल आण्णा यांनी दोघांमधील भांडण सोडवले. फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले. वाटेत वाहतूक कोंडी असल्याने ते भूमकर चौकाजवळ थांबले होते. त्यावेळी गायकवाड हा तेथे आला. त्याने फिर्यादीच्या पाठीत, मानेवर व डोक्यात टोकदार शस्त्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. तेथील लोकांनी फिर्यादी यांना गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फिर्यादी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.