पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीला उधआण आले आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर शेरेबाजी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय भाष्य केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी जगताप यांना देण्यात आली आहे. या प्रकरणी जगताप यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली असून, धमकी देणाऱ्या आरोपीला तत्काळ अटकेची मागणी जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जगताप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल देण्यात आल्यानंतर जगताप यांनी टीका केली. गेल्या चार दिवसांपासून जगताप यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचे संदेश पाठविण्यात येत आहेत. राजकीय भाष्य केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी जगताप यांना देण्यात आली आहे.
दरम्यान, जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मला गेल्या चार दिवसांपासून धमकीचा संदेश अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहे. मी राजकीय परिस्थितीवर टीका केली, तसेच आंदोलन केल्याने मला धमकावले जात असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून धमकी देणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.