पुणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याने तरुणाला हातातील फुटलेली काचेची बाटली खाली टाकण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरुणाने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. तसेच फुटलेली काचेची बाटली गळ्याजवळ आणून ‘मी तुला खल्लास करुन टाकीन’ अशी धमकी देऊन पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना कॅम्प येथील गणपती मंदिर व मारुती मंदिराच्याजवळील मोकळ्या जागेत घडली.
याप्रकरणी महिला पोलीस हवालदार विजया सुभाष वेदपाठक यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सोनू मनोज शिरसवाल (रा. वानवडी गाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजया वेदपाठक या सोलापूर बाजार येथे मार्शल म्हणून कर्तव्यावर होत्या. त्याचदरम्यान, आरोपी सोनू शिरसवाल हा फुटलेली काचेची बाटली हातात घेऊन जाताना दिसला.
फुटलेल्या काचेच्या बाटलीमुळे अपाय होण्याची शक्यता विचारात घेऊन, फिर्यादी यांनी आरोपीला थांबवून हातातील फुटलेली काचेची बाटली खाली टाकण्यास सांगितले. यामुळे आरोपीला राग आला. त्याने शिवागाळ सुरू केली. त्यावेळी विजया वेदपाठक यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये आरोपीचे शुटिंग घेतले. शुटिंग थांबवण्यासाठी आरोपीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. तसेच काठीने फिर्यादीच्या हातावर मारुन जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, हातातील मोबाईल हिसकावून घेत रस्त्यावर फेकून दिला.
दरम्यान, फिर्यादींनी आरोपीच्या हातातील काठी परत घेतली. त्यावेळी आरोपीने हातातील फुटलेली काचेची बाटली फिर्य़ादी यांच्या गळ्याजवळ आणून ‘मी तुला खल्लास करुन टाकीन’ अशी धमकी दिली आणि तो पळून गेला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डेंगळे करीत आहेत.